• महाराष्ट्राचा विकासदूत !

     



    लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने सलग तिसऱ्यांदा मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले. या सगळ्ळ्यांत महाराष्ट्रात एक गोष्ट घडली. अपेक्षित यश न मिळाल्यामुळे, त्या अपयशाची जबाबदारी स्वतःवर घेत महाराष्ट्रातील एका नेत्याने आपल्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याची आणि पक्षबांधणी करण्याची तयारी दर्शविली. हे पक्षश्रेष्ठींपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना धक्का देणारे होते. तो नेता म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस !

    देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ठळक नाव. मागील तीसहून अधिक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत. विद्यार्थी दशेपासून जनकार्यात सहभागी होत, लढा देत हे नेतृत्व पुढे आले. घरी वडिलांचा जनसंघाचा वारसा आणि धरमपेठ, नागपूर येथे झालेले संघाचे संस्कार घेतलेल्या या नेत्याच्या रूपाने ९० च्या दशकात नागपूरला नवा चेहरा मिळाला. अवघ्या २२ व्या वर्षी नागपूरचे महापौर होत फडणवीसांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली. त्यांचा राजकारणातला प्रवेश हा इतर राजकारण्यांच्या तुलनेत सोपा होता. मात्र राजकारणातली आजवरची वाटचाल ही कष्टसाध्य आहे. नागपूरमध्ये उत्तम महापौर म्हणून स्वतःला सिद्ध करत असतानाच १९९९ साली पहिल्यांदा आमदार होणारे देवेंद्र फडणवीस भाजपला सक्षम बनविण्यासाठी मार्गक्रमण करत राहिले. विरोधी बाकांवर असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, तेलगी गैरव्यवहार, क्रिमीलेअर उत्पन्न वाढवण्याची मर्यादा हे विषय त्यांनी उपस्थित केले. २०१४ साली संपूर्ण देशाने काँग्रेसराजला झिडकारून लावत 'कमळ' फुलविण्याचा मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला. राज्यात १२२ जागा मिळवत भाजप सगळ्यांत मोठा पक्ष ठरला आणि याचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना जाते.

    त्यांच्या कामाचे योग्य ते फळ मिळाले आणि महाराष्ट्राला ४० वर्षांत पहिल्यांदाच पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारा एक अभ्यासू, विकासाभिमुख मुख्यमंत्री मिळाला. कुठलेही कारण, अडचण न सांगता राज्याच्या जनतेसाठी, विकासासाठी अहोरात्र झटून धोरण आखणारा आणि त्याची प्रभावी अंमलबाजवणी करणारा नेता म्हणून फडणवीस यांच्याकडे बघितले जाते.

    मराठवाड्यासाठी योजना

    समाजातील प्रत्येक घटकासाठी फडणवीसांनी योजना अंमलात आणल्या. दळणवळण, आरोग्य, रोजगार, निवारा व अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध करून विकासाला गवसणी घातली. त्यांनी सुरू केलेली पोखरा योजना तर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करते आहे. मराठवाड्यातील दुष्काळ, नापिकी आणि पाणीटंचाई असे प्रश्न हाती घेत त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात 'मराठवाडा वॉटखीड 'सारखी योजना आणली. शेतकऱ्यांसाठी व तहानलेल्या मराठवाड्यासाठी ती संजीवनी ठरली. त्यांचीच 'जलयुक्त शिवार' ही योजना महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल ठरले. अनाथ मुलांसाठी शैक्षणिक आरक्षण असो किंवा आरोग्यदूत म्हणून राज्यातील लाखो गोरगरीब रुग्णांवर केलेले उपचार असो, त्यांचे काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

    विकास हा दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो ही दूरदृष्टी ठेवून फडणवीस यांनी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग साकारला. नागपूर, पुणे, मुंबई मेट्रो लाईनच्या प्रकल्पांनी दळणवळण बळकटच केले. फक्त साडेतीन जिल्हे नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम, उत्तर अशा राज्यातील सगळ्याच भागांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊनच फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात सर्वाधिक विदेशी गुतंवणूक आणली. औद्योगिक भरभराट होऊन औद्योगिक विकासात आपले राज्य वरच्या स्थानावर पोहचले, याचे श्रेय फडणवीस यांनाच जाते. 'एक अच्छा नेतृत्व या तो रास्ता तलाश लेता है या बना लेता है, पर बहाने नहीं बनाता' ही उक्ती फडणवीस यांना तंतोतंत लागू पडते. कठोर मेहनत, संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्राच्या विकासासाठी हा नेता पाय घट्ट रोवून उभा आहे. कितीही विरोध झाला तरी तो ढळला नाही. हरला नाही, पळाला नाही. मिळालेल्या शक्ती आणि अधिकारांचा योग्य वापर करत प्रामाणिकपणे, सातत्य आणि संयमाच्या जोरावर आपले नेतृत्व विकसित केले, त्यांनी राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –सकाळ ,२२ जुलै २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment