श्याम
मानव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला दबावाच्या राजकारणाचा
आरोप, हा त्यांची राजकीय अंधश्रद्धा दाखवणारा आहे. समाजवादी पंथातले मानव हे
भाजपचे कट्टर विरोधक आहेत. तर्कसंगतीच्या, बुद्धिवादाच्या
सगळ्या मर्यादा ओलांडून श्याम मानव आरोप करत आहेत. यामागे बारामती आहे का? श्याम मानव कोणाची कठपुतळी बनले आहेत ? या
प्रश्नांचा उहापोह करणे आवश्यक आहे.
अंधश्रद्धा
निर्मूलन चळवळीतले ख्यातनाम कार्यकर्ते प्रा. श्याम मानव यांनी अलीकडेच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून काही शेरेबाजी केली. देवेंद्र
फडणवीस यांच्यावर हल्ली कोणीही उठून टीका करतो. त्यामुळे मानव यांच्या टीकेला
आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. राज्य कारभाराच्या दृष्टीने राज्य व केंद्र
सरकारच्या काही निर्णयांच्या अनुषंगाने त्यावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक
सामान्य नागरिकाला आहे. त्यामुळे अशा टीकेचे लोकशाही प्रथेनुसार, परंपरेनुसार स्वागतच आहे. मात्र मानव यांची शेरेबाजी त्या चौकटीतली नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांच्यावर दबाव
टाकला होता. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल परब या सगळ्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव फडणवीस यांचा होता, १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे नाव घ्या, आदित्य ठाकरे यांचे नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्या,
अनिल परब यांचेही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या
प्रकरणात घ्या, असा दबाव अनिल देशमुख यांच्यावर फडणवीस यांनी
आणला होता. देशमुख यांनी तो दबाव झुगारून दिल्यामुळे त्यांना अटक झाली, असे प्रा. मानव यांनी म्हटले आहे.
श्याम
मानव यांनी बुवाबाजीला दिलेले आव्हान आणि त्यातून अंधश्रद्धेविरोधात तयार झालेला
कायदा याची माहिती उभ्या महाराष्ट्राला आहे. मानव यांनी गावोगावी जाऊन व्याख्याने
देऊन अंधश्रद्धाविरोधी चळवळ उभी केली. चळवळीतला कार्यकर्ता हीच त्यांची खरी ओळख
होती. सक्रीय राजकारणात त्यांची एवढी उठबस असेल हे माहिती नव्हते. अनिल देशमुख
यांच्यावर आलेला दबाव वगैरे गोष्टींबाबत खुद्द देशमुख यांनीही तोंडातून चकार शब्द
काढला नव्हता. मग मानव यांना या गोष्टीचे 'अमानवीय' पद्धतीने
आकलन झाले का,असा प्रश्न कोणत्याही बुद्धीवादी माणसाला पडू
शकतो. अनिल देशमुख यांना का व कशी अटक झाली? याचे मानव यांना
एवढ्या लवकर विस्मरण का झाले असावे, याचेच आश्चर्य वाटते.
मार्च २०२१ मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्यावेळचे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला मुंबईतून दरमहा १०० कोटींची वसुली करून
द्यावी, असे सांगितले होते, असा आरोप
केला होता. या आरोपामुळे महाराष्ट्र सरकारची संपूर्ण देशात नाचक्की झाली. त्यानंतर
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयने केलेल्या प्राथमिक
चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय गुप्तचर विभागाने अनिल देशमुख
यांच्यावर गुन्हा नोंदवला. यात फडणवीस यांनी जादूटोणा, भानामती
वगैरे काहीही केलेले नाही. मानव यांच्या बुद्धीवादी 'मती'ला उच्च न्यायालय वगैरे गोष्टी मान्यच नसतील तर आपला सगळा युक्तिवाद
व्यर्थ ठरेल. देशमुख यांच्या अटकेशी फडणवीस यांचा बादरायण संबंध जोडून आणि फडणवीस
यांच्यावर तसा जाहीर आरोप करून आपण राजकीयदृष्ट्या किती 'अंधश्रद्ध'
होऊ शकतो, याचा पुरावा मानव यांनी स्वतःहून
सादर केला आहे. मानव हे ज्या समाजवादी पंथाचे प्रतिनिधित्व करतात तो पंथ एकेकाळी
काँग्रेसच्या कट्टर विरोधातला म्हणून ओळखला जात होता. ज्येष्ठ समाजवादी नेते
दिवंगत राम मनोहर लोहिया यांनीच बिगर काँग्रेसवादाचा सिद्धांत मांडला होता.
त्यांच्याचमुळे १९६७ मध्ये उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये जनसंघ, समाजवादी, लोकदल आदी काँग्रेसविरोधी पक्षांची सरकारे
स्थापन झाली होती. मानव यांना हा इतिहास आठवत असेल. काळाच्या ओघात समाजवाद्यांचे
राजकीय अस्तित्व आकुंचन पावत गेले. भाजपने राजकीय पटलावर काँग्रेसविरोधातील अवकाश
व्यापायला सुरुवात केली. त्यावेळी समाजवादी पंथाने आपली उरली सुरली ताकद आपल्या
एकेकाळच्या कट्टर विरोधकांच्या मागे म्हणजे काँग्रेसच्या मागे उभी करण्यास प्रारंभ
केला. हे सांगण्याचे कारण या पंथातले असलेले मानव हे भारतीय जनता पक्षाचे कट्टर
विरोधक आहेत. भारतीय जनता पक्षाला विरोध जरूर करावा, भाजप
नेत्यांवर, केंद्र राज्य सरकारवर टीकेचे कोरडे जरूर ओढावेत.
मात्र
त्यामागे
तर्कसंगत कारणे असावीत. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे व अन्य मंडळींच्या विरोधात
बोलण्यास नकार दिला म्हणून त्यांना अटक झाली, असे म्हणणारे मानव हे त्यावेळचा घटनाक्रम
सोयीस्कररीत्या विसरत आहेत. उद्धव ठाकरे व त्यांच्या कार्यकारी संपादकांनीही आजवर
फडणवीस यांच्यावर असा आरोप केलेला नाही. ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांनीही असा
गौप्यस्फोट केला नाही. असे असताना मानव यांनी अचानक फडणवीस यांच्यावर असा आरोप
करणारी 'काळी बाहुली' का फेकावी,
यामागच्या रहस्याचे उत्तर शोधायला गेलेले श्वान पथक बारामती
हॉस्टेलच्या दिशेने आपोआप चालू पडले. मानव यांनी भाजप विरोधापायी तर्कसंगततेच्या,
बुद्धिवादाच्या सर्व सीमा ओलांडत आपण कोणाची कठपुतळी आहोत हे दाखवून
दिले आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी मानव यांच्यासारख्या
कठपुतळ्यांची संख्या वाढणार आहे. सामान्य मतदार अशा बोलक्या बाहुल्यांवर विश्वास
ठेवणार नाही. त्याचबरोबर अशी 'काळी जादू' कशी विफल ठरवायची हे भाजप नेतृत्वाला चांगले ठाऊक आहे.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – नवशक्ती ,३० जुलै २०२४)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment