• पहिली बाजू : असत्याची फॅक्टरी बंद पडेल!


    लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात सामान्य जनतेच्या मनावर सातत्याने खोटे बिंबविले गेले. त्यामुळे सामान्य माणूसही संभ्रमात पडला. खोट्या प्रचाराच्या तात्पुरत्या यशामुळे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचे धाडस आणखी वाढले आणि ते लोकसभेतही खोटे बोलू लागले, मात्र हा अपप्रचार फार काळ चालणार नाही. सामान्य भारतीय जनता या असत्याच्या फॅक्टरीला नक्की टाळे ठोकेल!

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुस्लिमांना देशातून बाहेर काढणार, दलित-आदिवासींचे आरक्षण रद्द करणार, संविधान बदलणार यासारख्या अनेक खोट्यानाट्या गोष्टी पसरवून काँग्रेस आणि इंडिया आघाडीने सत्तेसाठी आपण कोणत्या थराला जाऊ शकतो, याची प्रचीती दिली. समाजमाध्यमांतून या खोट्यानाट्या गोष्टींचा तुफानी प्रचार करून काँग्रेस पक्षाने लोकसभेतील आपले संख्याबळ ९९ जागांपर्यंत नेण्यात यश मिळवले.

    सामान्य जनतेच्या मनावर सातत्याने खोटे बिंबविले गेले. त्यामुळे सामान्य माणूसही संभ्रमात पडला. खोट्या प्रचाराच्या तात्पुरत्या यशामुळे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचे धाडस आणखी वाढले आहे. अन्य कोणत्याही मुद्द्यांवरून भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवडणुकीच्या रणांगणात सामना करण्याची हिंमत नसल्याने राहुल गांधींनी आता लोकसभेतही खोटे बोलण्याचे धाडस दाखवण्यास सुरुवात केली आहे.

    ‘अग्निवीर’विषयी खोटे दावे

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी खोटे बोलण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. चर्चेदरम्यान त्यांनी अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केले. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेतील अग्निवीरांना त्यांचे कर्तव्यावर असताना निधन झाल्यास हुतात्मा दर्जा दिला जात नाही, याशिवाय हुतात्मा झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांनाही मदत दिली जात नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्यांनी बुलढाण्यातील हुतात्मा अग्निवीर अक्षय गवते याचा उल्लेख केला होता. राहुल यांच्या वक्तव्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांचा आरोप सपशेल खोटा असल्याचे लोकसभेतच सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या दाव्यानंतर हुतात्मा अग्निवीर अक्षयचे वडील लक्ष्मण गवते यांनी त्यांना आतापर्यंत एकूण एक कोटी १० लाख रुपयांची मदत मिळाल्याचे सांगितले. त्यानंतरही राहुलबाबांनी आपला असत्याचा हेका कायमच ठेवला. ‘सत्य की रक्षा हर धर्म का आधार है!’ असे म्हणत राहुल गांधींनी अजय सिंह यांच्या कुटुंबीयांना लष्कराकडून कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य मिळाले नसल्याचा दावा एक्स या समाजमाध्यमावर केला होता. राहुल गांधींनी हा दावा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजय सिंह याच्या वडिलांनी लष्कराकडून आपल्याला भरपाई मिळाल्याचे स्पष्ट केले. या मुद्द्यावरून राजकारण करू नका, अशी विनंती करणारा अजय सिंह याचे वडील चरणजीत काला यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. हुतात्मा सैनिकाचे वडील आपल्याला अग्निवीर योजनेनुसार अर्थसाहाय्य मिळाले असल्याचे सांगत असताना त्याचा प्रतिवाद करण्याचे धैर्य राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी दाखवले नाही.

    अग्निवीर योजनेनुसार अजय सिंह याच्या कुटुंबीयांना ९८.३९ लाख रुपये देण्यात आले आहेत. या योजनेतील तरतुदीनुसार ६७ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य व अन्य फायदे काही प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर लवकरच दिले जातील, असे निवेदन भारतीय लष्कराकडून ३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

    लष्कराचे निवेदन आणि अजय सिंह याच्या वडिलांचा खुलासा पाहिल्यावर राहुल गांधी यांच्या ‘झूठ का दुकान’मधून किती विखारी प्रचार सुरू आहे, याची कल्पना येऊ शकते. एकीकडे ‘सत्य की रक्षा हर धर्म का आधार है!’ अशी एखाद्या महात्म्याला, तत्त्ववेत्त्याला शोभेल अशी भाषा करायची आणि दुसरीकडे ‘गोबेल्स’ही लाजेल असे खोटेनाटे सांगत फिरायचे, हे फक्त राहुल गांधींनाच जमू शकते. सत्तेत येण्यासाठी अधीर झालेल्या या युवराजांना धादांत खोट्याचा आधार घेण्याशिवाय दुसरा रस्ता दिसू नये, हे गांधी-नेहरू घराण्याचे दुर्दैवच म्हणायचे.

    खोटे व्हिडीओ प्रसारित

    गेली सलग १० वर्षे केंद्रातील सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे राहुल गांधी आणि अनेक काँग्रेसजनांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. अनेक राज्यांतून काँग्रेस हद्दपार झाली आहे. मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांतील विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा आलेख आणि अनेक वर्षे देशाची सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसचे प्रगती पुस्तक याच्यातील ठसठशीत फरक सामान्य भारतीय नागरिकाला जाणवू लागला आहे. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अर्थसाहाय्यापैकी एक पैसाही मध्यस्थांच्या आणि दलालांच्या खिशात न जाता लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट जमा होऊ लागला आहे. अशा सरकारला निवडणुकीच्या युद्धात समोरासमोर लढून पराभूत करणे अशक्य आहे, हे कळून चुकलेल्या काँग्रेस नेतृत्वाने या निवडणुकीत खोट्या प्रचाराचा आश्रय घेतला. एआय तंत्रज्ञानाचा वापर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोटा व्हिडीओ प्रसारित केला आणि आरक्षण रद्द करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाला ४०० जागा हव्या आहेत, असे मतदारांच्या मनावर बिंबवण्यास सुरुवात केली.

    नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) अमलात आल्याने मुस्लिमांना देश सोडून जावे लागणार, अशा पद्धतीचा प्रचार करून काँग्रेस पक्षाने मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण केली. अशा अनेक अफवा पसरवूनही काँग्रेसला लोकसभेत तीन आकडी जागा मिळवता आल्या नाहीत. राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी याही खोटेनाटे पसरवण्यात आपल्या बंधूपेक्षा सवाई ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून एका कॅब चालकाचा मृत्यू झाला. खरे तर या टर्मिनलचा अपघात झालेला भाग २००९ मध्ये मनमोहन सिंह सरकार सत्तेत असताना बांधला गेला होता. तरीही प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्च २०२४ मध्ये उद्घाटन झालेल्या भागातील छत कोसळले, असे ट्वीट केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपप्रचार करूनही मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले. त्यामुळे चवताळलेल्या काँग्रेस नेतृत्वाने सध्या ‘असत्यचंद्राची फॅक्टरी’च सुरू केली आहे. आता त्यासाठी लोकसभेसारखे पवित्र व्यासपीठही वापरण्याचा निगरगट्टपणा राहुल गांधींनी दाखवला आहे. काळाच्या ओघात सामान्य भारतीय जनता या फॅक्टरीला नक्की टाळे ठोकेल, असा विश्वास आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – लोकसत्ता ,०९ जुलै २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment