• मविआ झूठ बोले, कानून काटे...

     उबाठाच्या संजय राऊत यांना झालेली १५ दिवसांची कैद म्हणजे बेलगाम आरोप केले जातात, याचेच उदाहरण आहे. संजय राऊत असोत की अरविंद केजरीवाल असोत, पुराव्याशिवाय खोटे आरोप करणाऱ्यांना शेवटी न्यायालयाच्या दारात उभे राहावे लागते. अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधी यांनीही खोटे आरोप केले. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही खोट्याची जादू चालावी, अशी विरोधकांची अपेक्षा आहे. पण कायदाच त्यांना योग्य ते उत्तर देईल.



    उबाठा सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी ‘कीर्ती’ प्राप्त केलेल्या खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. किरीट सोमय्या यांच्या पत्नीशी संबंधित एका संस्थेवर केलेल्या आरोपांबाबत संजय राऊत यांना मुंबईतील माझगाव न्यायालयाने दोषी ठरवून १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच २५ हजारांचा दंडही ठोठावला आहे. मेधा सोमय्या युवक प्रतिष्ठानने बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर येथे सार्वजनिक शौचालय बांधण्याचे कंत्राट मिळवले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी हा आरोप केला तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत होते. डॉ. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अलिबागजवळच्या १९ बंगल्यांच्या माहितीचा उल्लेख दडविल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद उमेदवारी अर्जात आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या या बंगल्यांची माहिती दिली नव्हती, असे डॉ. सोमय्या यांनी कागदपत्रांसह दाखवून दिले होते. उद्धव ठाकरे यांच्यावर तसेच उबाठा नेते अनिल परब यांच्यावर ठोस पुराव्यांसह शासकीय कागदपत्रे सादर करत आरोप केले होते. या आरोपांना समाधानकारक उत्तर देता येत नसल्याने उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेलेचपाटे हैराण झाले होते. डॉ. सोमय्या यांच्या आरोपांपासून बचाव करण्यासाठी संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. राऊत यांच्या आरोपांची दखल घेत त्यावेळच्या महाविकास आघाडीने या आरोपांची चौकशी करण्याचे आदेशही दिले होते. मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांना न्यायालयात खेचल्यावर त्यांना आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळेच न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवले आहे.

    केवळ संजय राऊतच नव्हेत, तर महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते महायुती सरकारविरुद्ध सातत्याने खोटे आरोप करण्यात मश्गुल आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपात काहीच गैर नसते. मात्र ते आरोप-प्रत्यारोप करताना राज्यात, देशात अस्थिरता माजावी, विविध समाजघटकांमधील सलोखा नष्ट व्हावा, धार्मिक सामंजस्य संपुष्टात यावे अशा हेतूने आरोप केले जात असतील तर अशा राजकारण्यांची पातळी किती घसरणीला लागली आहे, याची कल्पना येते. सव्वादोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांना हटवून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या महाविकास आघाडीने खोट्या आरोपांची राळ उडवून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातमध्ये नेले जात आहेत, अटल सेतूला खड्डे पडले आहेत, यासारखे आरोप महाविकास आघाडीने गेल्या काही महिन्यांत केले आहेत. अलीकडेच पुण्यात सिटी पोस्ट या सरकारी संस्थेच्या आवारात खड्डा पडला होता. त्या खड्ड्यात एका ट्रकचे चाक रुतले गेले. त्या ट्रकची छायाचित्रे प्रसारित करून पुण्यात महापालिकेने बांधलेला रस्ता खचला, असा प्रचार करण्यात महाविकास आघाडीचे नेते आघाडीवर होते. बदलापूर येथे लहानग्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तेथे आंदोलन पुकारून रेल्वे सेवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला गेला. पोलीस यंत्रणेने अनेकवेळा विनंती करूनही बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावर उतरलेली मंडळी मागे हटण्यास तयार नव्हती. पोलिसांवर दगडफेक करण्याचे प्रकारही यावेळी घडले. पोलिसांना गोळीबार करण्यास भाग पाडावे, अशा हेतूनेच आंदोलकांना चिथावले जात होते. पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली आणि कोणताच अनुचित प्रकार घडू दिला नाही. लोकसभा निवडणुकीत आरक्षण संपवणार, अल्पसंख्यांक धर्मीयांना देशाबाहेर काढणार, यांसारख्या अफवा महाविकास आघाडीने पसरवल्या. त्याचे फळ त्यांना मुस्लीम धर्मीयांच्या एकगठ्ठा मताद्वारे मिळाले. लोकसभा निवडणुकीत खोट्याची जादू चालली. मात्र विधानसभा निवडणुकीत ही जादू उपयोगी पडणार नाही, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात येऊ लागल्याने विविध मार्गांनी राज्यात हिंसक घटना कशा घडतील, यादृष्टीने मविआ नेते प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होत आहे, असे वक्तव्य शरद पवार यांचासारखा ज्येष्ठ नेता करतो तेव्हा त्याचे गांभीर्य वाढते. येनकेनप्रकारे सत्ता मिळवण्यासाठी आपल्या मायभूमीत अस्थिरता निर्माण करण्याचे मविआ नेत्यांचे प्रयत्न दुर्दैवी आहेत.

    काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर प्रश्‍न उपस्थित करत केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत हुतात्मा दर्जा दिला जात नाही, याशिवाय हुतात्मा झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांनाही मदत दिली जात नाही, असाही आरोप केला होता. यावेळी राहुल गांधी यांनी बुलढाण्यातील हुतात्मा अग्निवीर अक्षय गवते याचा उल्लेख केला होता. राहुल यांच्या वक्तव्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांचा आरोप सपशेल खोटा असल्याचे लोकसभेतच सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या दाव्यानंतर हुतात्मा अग्निवीरचे वडील लक्ष्मण गवते यांनी त्यांना आतापर्यंत एकूण एक कोटी १० लाख रुपयांची मदत मिळाल्याचे सांगितले. त्यानंतरही राहुलबाबांनी आपला असत्याचा हेका चालूच ठेवला. ‘सत्य की रक्षा हर धर्म का आधार है!’ असे म्हणत राहुल गांधींनी अजय सिंह यांच्या कुटुंबीयांना लष्कराकडून कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळाले नसल्याचा दावा एक्स या समाजमाध्यमावर केला होता. राहुल गांधींनी हा दावा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजय सिंह याच्या वडिलांनी लष्कराकडून आपल्याला भरपाई मिळाल्याचे स्पष्ट केले. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यावर आरोप केले होते. नितीन गडकरी यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर केजरीवाल यांना पळता भुई थोडी झाली. न्यायालयात केजरीवाल यांना बिनशर्त माफी मागावी लागली. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतरही संजय राऊत यांचा बेमुर्वतखोरपणा कमी झाला नाही. या निकालाबद्दल त्यांनी न्याय व्यवस्थेवरच ताशेरे झाडले. राहुल गांधी यांच्यावरही सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याची वेळ आली होती. तरीही त्यांची आरोप करण्याची हौस कमी झालेली नाही. या निकालानंतर तरी मविआ नेत्यांना शहाणपण येईल, अशी आशा आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – नवशक्ती०१ ऑक्टोबर २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment