• छावा अभी जिंदा है


    महाराष्ट्रद्वेष्ट्या औरंगजेबाबाबत अबू आझमी यांच्या मनात आपुलकीची भावना आहे. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाचा उदो उदो नको, अशी भूमिका घेत त्याच्या कबरीचे संरक्षण करावे लागते, याविषयी जी खंत व्यक्त केली आहे ती योग्य अशीच आहे. याबाबत विरोधी पक्षांचे वर्तन मात्र दुटप्पी आहे.


    आपले अवघे जीवन समर्पित करून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी ज्याने आयुष्यभर प्रयत्न केले आणि छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली त्या जुलमी औरंगजेबाची प्रशंसा महाराष्ट्रात होणे हीच शरमेची बाब आहे. महाराष्ट्राने तीनशे वर्षे औरंगजेबाचा तिरस्कार केल्यानंतर आता त्याची कबर कशी वाचवता येईल, या विचाराने जंग जंग पछाडणे हे अवघ्या महाराष्ट्राला विचलित करणारे आहे. केवळ आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही जणांचा हा प्रयत्न असल्याने ते अधिक व्यथित करणारे आहे.

    औरंगजेबाची कबर हवीच कशाला, असा संतप्त सवाल कुणी विचारत असेल तर ती त्याच्याबद्दलच्या कोपातून सहज व्यक्त झालेली भावना म्हणावयास हवी. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रेम असलेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अशी भावना आहे. मग आता असा अचानक औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न विरोधक कापरासारखा का पेटवत आहेत? राज्याला नकोशा असलेल्या या प्रश्नाचा मुडदा आधी कोणी उखडून काढला ? औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख करून तो एक उत्तम प्रशासक होता, असे म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधिमंडळ परिसरात औरंगजेबाची प्रशंसा केली. त्यातून महाराष्ट्रद्वेष्ट्या औरंगजेबाबाबतच्या त्यांच्या भावना किती आपुलकीच्या आहेत, याची प्रचिती सर्वांनाच आली. पोटात होते तेच त्यांच्या ओठावर आले. अबू आझमी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करून केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचा शत्रू असलेल्या औरंगजेबाची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. हा प्रकार जाणीवपूर्वक केलेला होता. त्यांनी असे वक्तव्य करणे वाचाच दुसरा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे कर्तृत्व कमी लेखण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे म्हटले पाहिजे. उत्तम प्रशासकाविरुद्ध लढणारे म्हणजेच ते चुकीचे होते, असे अप्रत्यक्षरीत्या काही विशिष्ट वर्गाच्या मनात बिंबवण्याचा हा अश्लाध्य आणि निंदनीय प्रकार होता. त्याची शिक्षा त्यांना विधिमंडळाचे अधिवेशन संपेपर्यंत त्यांचे निलंबन होण्याने मिळाली. अबू आझमी यांच्यासारख्या नेत्यांकडून अन्य कोणती अपेक्षा करणार?

    खरे तर, वाईट वाटते ते विरोधी पक्षांच्या दुटप्पीपणाचे. अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांचे निलंबन करण्यात यावे, ही मागणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही केली होती. पण विरोधी पक्षांच्या वागण्यात विसंगती दिसून आली ती त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करण्यात यावे यावर भर दिला तेव्हा. सोयीचे राजकारण करण्यासाठी आपल्याला हवे तसे मुद्दे वळवणे ही समाजाशी केलेली प्रतारणाच होय. विरोधी पक्षाचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. कोणताही पक्ष असो, एकच भूमिका ठाम असली पाहिजे. औरंगजेबची स्तुती करणाऱ्याला विरोध केला की आपल्याला एक वर्ग अनुकूल होतो आणि कबरीच्या संरक्षणासाठी आकांडतांडव केले की दुसरा वर्गही अनुकूल होईल, अशी भूमिका ठेवणे हा किळसवाणा प्रकार आहे. दोन्ही दगडांवर पाय ठेवणारा तोंडघशी पडतो, हे तरी ध्यानात ठेवायला हवे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या पुस्तकात जो वादास्त मजकूर लिहिला होता त्याबाबतही कधीतरी बोलावे.

    'फोडा आणि झोडा' ही ब्रिटिशांची नीती होती. मराठ्यांना औरंगजेबाबाबत किती राग आहे याची कल्पना त्यांना होती. म्हणूनच भारतातील समाजात दरी निर्माण करण्यासाठी १९०४-०५ च्या दरम्यान आलेल्या लॉर्ड कर्झन याने हेतुपूर्वक या कबरीचे सुशोभीकरण केले. संगमरवरी दगडाने कबरीची सजावट केली. औरंगजेबाला मानणाराही एक वर्ग आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी त्याने तसे केले हे ध्यानात घेतले पाहिजे. ब्रिटिशांनंतर आता विरोधी पक्षांना तसे उमाळे येत आहेत.

    इतिहासातील महाराष्ट्रद्रोही प्रवृत्तींशी कुणाला तरी जवळीक वाटते, म्हणूनच तर उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांवरही कुऱ्हाडीनिशी प्राणघातक हल्ले करण्याचे धाडस केले जाते. त्याबाबत मात्र विरोधी पक्ष काही बोलत नाहीत. औरंगजेबप्रमाणेच विजापूरचा सरदार अफजल खान याचीही कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. गेली साडेतीनशे वर्षे असलेल्या या साध्या कबरीचे अवघ्या वीस वर्षात मकबऱ्यात कसे रूपांतर झाले, ते पहा. सन २००० मध्ये त्या कबरीचे सुशोभीकरण करण्याचा घाट घातला गेला, वनखात्याची जमीन असूनही त्या कबरीलगत अनधिकृत बांधकामे उभी राहिली. अखेर ती अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाला द्यावे लागले. जिथे अशी ठिकाणे आहेत तिथे अनधिकृत बांधकामे उभारण्याचे काम संपूर्ण देशात गेल्या पन्नास वर्षांत होत आले. अशी ठिकाणे महाराष्ट्रद्रोही जनतेची प्रेरणास्थळे होत असतील तर त्याची दखल कोण घेणार?

    नागपुरात व्हायरल झालेल्या वादग्रस्त चिथावणीखोर पोस्ट बांगलादेशातून प्रस्त करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आल्याने ती ब्लॉक करण्यात आली. हिंसाचार पूर्वनियोजित होता. म्हणजे धागेदोरे कुठवर पोहोचले आहेत ते पहा. दंगलीचा सूत्रधार हा लोकसभा निवडणूक लढवलेला निघतो. याचा अर्थ दंगलखोर प्रवृत्तीची माणसे राजकारणात जम बसवू पहात आहेत.

    राज्यातील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीचा उदो उदो नको, असा इशारा देत त्याच्या कबरीचे संरक्षण करावे लागत असल्याची खंत व्यक्त केली तर ते कौतुकास्पद आहे. कारण शिवरायांच्या राज्यात हिंदवी स्वराज्याबाबत अशी आस्था प्रकट करण्याची प्राज्ञा गेल्या कित्येक वर्षांत विशिष्ट वर्गाचे संतुष्टीकरण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी दाखवली नव्हती. आता त्याची सुरुवात झाली आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति२५ मार्च २०२५)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment