आज ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यानिमित्त या प्रकल्पाविषयी…—
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांतील मोठा काळ
लांगूलचालनाच्या राजकारणात गेल्यामुळे विकासवाद रेंगाळला. आठ वर्षांपूर्वी भाजपचे
सरकार केंद्रात सत्तेवर आले आणि पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतानाच नरेंद्र मोदी
यांनी एका नव्या त्रिसूत्रीनुसार सत्ताकारण करण्याचे जाहीर केले. विकास हा
सत्ताकारणाचा केंद्रबिंदू तर असेलच, पण या विकासाची फळे देशाच्या अखेरच्या स्तरावरील
नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजेत, अशा विकासाचे धोरण आखण्यास मोदी सरकारने प्राधान्य दिले
आणि विकासवाद हा मुद्दा राजकीय प्रवाहांच्या केंद्रस्थानी आला. गेल्या आठ वर्षांचा
देशाच्या वाटचालीचा आढावा घेताना, वेगवान विकासाचा मुद्दा कोणालाच नजरेआड करता येणार नाही.
कारण सत्तेवर आल्यापासूनच्या प्रत्येक दिवसागणिक पंतप्रधान मोदी यांनी एका
गोष्टीवर सातत्याने आणि कटाक्षाने भर दिला. ती गोष्ट म्हणजे, ‘इंडिया फर्स्ट’!
राजकारण असो की सत्ताकारण, त्या परीघाचा केंद्रबिंदू हा विकासाचाच असला पाहिजे आणि
देशहित हेच त्याचे प्राधान्य असले पाहिजे, यासाठी मोदी
केवळ उक्तीने नव्हे, तर कृतीने आग्रही राहिले आणि सब का साथ, सबका विकास हा
मंत्र कृतिशील झाला. सरकारचे प्रत्येक धोरण आणि प्रत्येक कृती ही देशाच्या
विकासाची, देशाच्या
अंतर्गत सुरक्षेची आणि जगात देशाची प्रतिष्ठा उंचावणारीच असली पाहिजे, यासाठी गेल्या
आठ वर्षांपासून सुरू असलेल्या स्वार्थनिरपेक्ष सत्ताकारणातून देशाच्या विकासाची
वाटचाल वेगवान झाली आणि कायापालटाचे दृश्य रूप देशाच्या नकाशावर जागोजागी उमटू
लागले.
डिजिटल क्रांती, देशांतर्गत लसनिर्मितीपासून सुरू झालेले अद्ययावत
आरोग्यसुविधांचे नवे पर्व, पायाभूत सुविधांचे जाळे आणि सुरक्षिततेची हमी यांमुळे
जगाच्या नकाशावर भारताची प्रतिमा आज प्रतिष्ठितपणे उजळली आहे. जागतिक मंचावर
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना मिळणाऱ्या सन्मान आणि आदरामुळे सामान्य
भारतीयाचा आत्मविश्वासही बळावला आहे. हे केवळ उक्तीतून साधत नसते. पंतप्रधानपदाची
सूत्रे हाती घेतल्यापासूनचा प्रत्येक क्षण देशाच्या विकासाचा विचार, सेवा, सुशासन आणि गरीब
कल्याण या त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीचे ध्येय यांतून न्यू इंडियाचे एक वैभवशाली
चित्र निर्माण झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी
समृद्धी महामार्गाच्या रूपाने राज्याच्या प्रगतीच्या नव्या इतिहासाचे पहिले पान ११
तारखेस उघडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रगतीच्या या सुचिन्हाचे उद्घाटन होईल आणि
महाराष्ट्राच्या समृद्धीची नवी वाटचाल नव्या वेगाने सुरू होईल. केवळ
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या प्रगतीचा मानबिंदू ठरणाऱ्या सुमारे
७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरील पहिल्या टप्प्याच्या वेगाची चुणूक गेल्या
रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिली. नागपूर ते शिर्डी हा ५३० किलोमीटर
अंतराचा टप्पा केवळ पावणेपाच तासांत पार करून एक प्रकारे उंचावणाऱ्या वेगाचा नवा
आलेखच फडणवीस यांनी आखला आणि महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा अभिमानाने सुखावला.
विकासाचे कोणतेच प्रकल्प विरोधाविना पूर्ण होत नसावेत.
विरोध हा विकासाला मिळालेला शाप असावा. विरोधाला आक्षेपही असायचे कारण नाही, मतभेदाचे मुद्दे
चर्चेतून दूर करता येतात पण विकास होऊच देणार नाही ही भूमिका काही जण घेतात.
तरीदेखील विकासाला जनहिताच्या ध्यासाचे पाठबळ असल्यामुळे विकासाची पुण्याई अधिक
असते, म्हणून विरोधाचा
शापही त्यापुढे थिटा पडत असावा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गातही विरोधाचे खोडे
घालण्याचा प्रयत्न झालाच होता. आंदोलने झाली, विनाशाचे शापही
उच्चारले गेले पण विरोधास न जुमानता काम सुरू राहिल्यामुळे तयार झालेल्या मुंबई
पुणे द्रुतगती महामार्गाने उघडलेली विकासाची दालने आज महाराष्ट्र अनुभवतो आहे.
समृद्धी महामार्गाच्या वाटेवरही विरोधाचे काटे पसरण्याचे प्रयोग झाले. नाशिक, नगर, ठाणे जिल्ह्यांत
आंदोलनाचे इशारे उच्चारले गेले. शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गाच्या प्रकल्पाकरिता
घेऊ देणार नाही असा इशारा देत सुमारे सहा वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी
आंदोलकांच्या बाजूने दंड थोपटले होते, कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका, असा कानमंत्रही
प्रकल्पाच्या विरोधकांना दिला होता, पण फडणवीस सरकारने २४ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात
भरपाईचे पैसे जमा केले आणि विरोधाची जागा सहकार्याने घेतली.
विरोध मावळला आणि अगोदर विरोधकांच्या बाजूने उभे
राहणाऱ्या त्याच ठाकरे यांनी पुढे मुख्यमंत्री म्हणून या प्रकल्पाच्या पाठपुरावा
सुरू केला, ही प्रकल्पाची
पुण्याई म्हणावी लागेल. महाराष्ट्रातील १० जिल्हे, २६ तालुके आणि
३९२ गावांतून जाणारा व महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी यांनी जोडणारा महामार्ग
एवढेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे महत्त्व नाही, तर
महाराष्ट्राची राजधानी आणि संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महामुंबईशी
विदर्भ, मराठवाडा आणि
खान्देशाचे नवे आर्थिक नाते जोडणारा महामार्ग म्हणून या महामार्गाची भविष्यातील
भूमिका म्हणजे महाराष्ट्राच्या उत्कर्षाची भाग्यरेखा असणार आहे. या महामार्गावरील
संकल्पित कृषी समृद्धी केंद्रे आणि शेतीपूर्क उद्योगांचे नवे जाळे ग्रामीण
महाराष्ट्रासाठी रोजगाराच्या लाखो संधी घेऊन गावोगावी पोहोचणार आहे.
रस्ते विकास हा विकासाचा प्रमुख मापदंड आहे. अमेरिका
समृद्ध आहे म्हणून तेथील रस्ते चांगले आहेत असे नाही, तर तेथील रस्ते
चांगले आहेत, म्हणून अमेरिका
समृद्ध आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर रस्ते विकास हा सरकारचा सर्वोच्च
प्राधान्यक्रम राहिला आणि विक्रमी वेळात रस्त्यांचे दर्जेदार जाळे उभारण्याचा एक
आखीव कार्यक्रम निश्चित करण्यात आला. गावे, शहरे आणि
महानगरे जोडणे हे केवळ भौगोलिक अंतर कमी करण्यापुरत्या मर्यादित उद्दिष्टाचे काम
नव्हे, तर यातून
गावोगावीच्या संस्कृतीचे शहरांशी, महानगरांशी नाते जुळते आणि संस्कृती समृद्ध होते. सामाजिक
जवळीक तयार होते, परंपरा आणि नवतांचा अनोखा संगम साधण्यासाठी रस्त्यांचे
आधुनिक सुविधांचे जाळे गेल्या आठ वर्षांत देशाला नव्या अस्मितेची ओळख करून देणारे
ठरले आहे. याच मालिकेतील प्रतिष्ठेचा आणि ऐतिहासिक ठरणारा रस्ता मिरविण्याचे भाग्य
महाराष्ट्राच्या भूमीला लाभले आहे.
मुंबई ते नागपूर हा सातशे किलोमीटर लांबीचा रस्ता
विकासाच्या प्रक्रियेत आपले भक्कम स्थान निर्माण करणार आहेच, पण
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील समाजजीवन, संस्कृती आणि
परंपरांना जोडणारा एक भक्कम धागादेखील ठरणार आहे. समृद्धी महामार्ग हे सार्थ नाव
धारण करणारा आणि देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेला हा महामार्ग केवळ
उद्योगांना, गुंतवणुकीला
प्रेरणा देणारा ठरेल एवढेच नाही, तर महाराष्ट्राचा शेतकरीदेखील या महामार्गावरून
समृद्धीच्या वाटेवर नवी पावले टाकणार आहे. मोदी सरकारच्या सबका साथ सबका विकास या
ध्येयामध्ये देशातील शेतकऱ्याचे स्थान महत्वाचे आहे. सन २०१४ ते २०२२ या आठ
वर्षांत भाजप सरकारने त्याआधीच्या सात वर्षांहून चार पट अधिक गुंतवणूक केंद्रीय
अर्थसंकल्पाद्वारे कृषी क्षेत्रात केली आणि शेती क्षेत्रात क्रांतीची पहाट उगवली.
बीज से बाजार तक या धोरणाच्या कृतिशील अंमलबजावणीचा अनुभव समृद्धी महामार्गावर
जागोजागी उभारल्या जाणाऱ्या कृषी केंद्रांतून महाराष्ट्राला येईल, तेव्हा या
क्रांतीची फळे बहरल्याच्या आनंदाने महाराष्ट्र उजळून निघेल.
मुंबई ते नागपूर अशा दुतर्फा असलेल्या या महामार्गाचे
आणखी एक आगळे वैशिष्ट्य विकासाच्या इतिहासात नोंदले जाणार आहे. ते म्हणजे, या मार्गावरून
कोणत्याही दिशेने होणाऱ्या प्रवासाचा अंतिम टप्पा हा समृद्धीचाच राहणार आहे.
गेल्या आठ वर्षांत वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या क्रांतीची चिन्हे आता
देशाचा कानाकोपरा व्यापून राहिली आहेत. आठ वर्षांपूर्वी देशाच्या केवळ पाच
शहरांतून धावणाऱ्या मेट्रो रेल्वेसेवेने आता २७ शहरांमध्ये संचार सुरू केला आहे.
कोलकाता, दिल्ली, बंगळूरु, सुरत, हैदराबाद या
शहरांत विजेवरील बसगाड्या धावू लागल्या आहेत, तर २०१४ पूर्वी
देशात असलेल्या विमानतळांच्या संख्येने दुपटीची झेप घेत ७० वरून १४० वर मजल मारली
आहे. सुसह्य जीवनशैली हा विकासाच्या धोरणाचा मूलमंत्र आहे. गरीब कल्याण हा ध्यास
आहे आणि इंडिया फर्स्ट हे ध्येय आहे. समृद्धी महामार्गाचा प्रारंभ या सर्वांचा
संगम घडविणारा धागा बनणार आहे. महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाच्या रूपाने मोदी
सरकारच्या स्वप्नपूर्तीचा मोठा हिस्सा बनण्याचे भाग्य लाभले, ही समाधानाची
बाब आहे.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता ऑनलाइन, ११ डिसेंबर.
२०२२)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment