काँग्रेसच्या युवराजांवर कॅडबरी च्या 'कभी कुछ ना कर के भी देखो' या जाहिरातीचा फारच प्रभाव पडला असावा. त्यामुळेच ते हिमाचल प्रदेशकडे
फिरकले नसावेत. त्याचाही काँग्रेसला फायदा झाला असावा.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला
मिळालेले विक्रमी बहुमत, हिमाचल प्रदेशात सत्ता गमावली तरी मिळालेली 43
टक्के मते... ‘मोदीनॉमिस्क’च्या जादूचा प्रभाव अखिल भारत वर्षावर कायम आहे,
हे या निकालांचे सार म्हणावे लागते. 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काय असणार, याचा अंदाज या निकालातून येऊ शकतो. या निकालातून बोध घेऊन आपली रणनिती
बदलण्याची तसदी विरोधक आणि विचारवंत मंडळी घेणार नाहीत, अशी
खात्री निकालानंतरच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर वाटू लागते. ‘मोदीनॉमिक्स’चा अर्थ
आणि त्याचे मतदारांवर होणारे परिणाम विरोधकांना जाणून घ्यावेसे वाटत नाहीत.
परिणामी ‘मोदीनॉमिक्स’ला विरोध करतानाचा त्यांचा सूर पूर्णत: व्यक्ती केंद्रीत
होऊन जातो. हा सूर अनेकदा असभ्य, गलिच्छ भाषेत परावर्तित
होतो.
गुजरातच्या निकालांचे वास्तव आणि त्याचे राष्ट्रीय
राजकारणावर होणारे परिणाम जाणून घेण्याआधी हिमाचल प्रदेशच्या निकालाकडे वळू. मोदी
विरोधकांना हिमाचल प्रदेशच्या निकालामुळे हर्ष वायू होण्याचे बाकी आहे. सातत्याने
होणार्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर अशा विजयाचा काँग्रेस समर्थक विचारवंत आणि
विश्लेषकांना आनंद होणे साहजिकच आहे. निकालाच्या आकड्यामागचे दडलेले अर्थ
शोधण्याची या विचारवंत आणि विश्लेषकांची तयारी नसते. कोणत्या पक्षाला किती जागा
मिळाल्या याही पेक्षा अधिक महत्व कोणत्या पक्षाने एकूण मतदानांच्या किती टक्के
मतदान प्राप्त केले, याला असते.
निवडणुकीच्या निकालांचा अर्थ उलगडण्याचे शास्त्र बारकाईने जाणून
घेतले तरच निकालांचे सखोल आणि नि:पक्षपाती विश्लेषण करता येते. जनमत चाचणी
(ओपिनियन पोल) आणि मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल) यातून प्राप्त होणार्या
आकडेवारीचे विश्लेषण करताना व त्याआधारे निकालाचे भाकीत वर्तवताना निकालांच्या
आकड्यामागचे दडलेले अर्थ जाणून घेतले जात नाहीत. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस
यांनी जिंकलेल्या जागांमध्ये 15 जागांचा फरक असला तरी
काँग्रेसला भाजपापेक्षा फक्त 1 टक्के अधिक मते मिळाली
आहेत. काँग्रेसला 43.90 टक्के आणि भाजपाला 43 टक्के मते मिळाली आहेत. केवळ एक टक्का मते कमी मिळाली म्हणून भाजपाला 15 जागांचा फटका बसला. भारतीय जनता पार्टीला 18
लाख 14 हजार 530 तर काँग्रेसला 18 लाख 52 हजार 504 मते
मिळाली आहे. याचा अर्थ काँग्रेसला भारतीय जनता पार्टीपेक्षा 37 हजार 974 मते अधिक मिळाली आहेत. पाच
मतदारसंघात भाजपा उमेदवारांचा 860, 399, 567, 382 आणि 60 एवढ्या अल्प मतांनी पराभव झाला आहे. सत्तेत असण्याचे काही फायदेही
असतात त्याचबरोबर काही तोटेही असतात. हिमाचल प्रदेशात यावर्षीच्या निवडणुकीत राज्य
सरकारी कर्मचार्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न प्रचाराचा मुद्दा बनला होता.
भाजपा सरकारने जुन्या निवृत्ती वेतन योजनेची मागणी अमान्य केल्याने त्याचा विपरीत
परिणाम पक्षाला सहन करावा लागला, असे दिसते. मात्र जुनी
निवृत्ती वेतन वेतन योजना राबवली तर राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल हा
दूरगामी विचार करूनच इतरांनी जरी हे लालूच दाखवले असले तरी लोकप्रीय मार्गाने न
जाता मोदीजींनी याला विरोध केला. हिमाचलच्या विजयानंतर काही काँग्रेस नेते,
विचारवंत विश्लेषक काँग्रेसच्या विजयाची ही तर सुरुवात आहे,
नरेंद्र मोदी यांचा प्रभाव संपला यासारख्या प्रतिक्रिया देत
होते. हिमाचलमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले नसले तरी मतदारांनी
झिडकारलेले नाही. निकालाच्या आकड्यांमागचा हा खरा अर्थ आहे.
गुजरातच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून राहणे
स्वाभाविकच होते. आम आदमी पक्षाच्या सहानुभूतीदार, विचारवंतांनी आणि स्वयं घोषित
माध्यमतज्ज्ञांनी दोन-तीन महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीला यावेळची निवडणूक जड
जाणार आहे, असा प्रचार समाजमाध्यमातून सुरू केला होता. या
हवेवर विसंबून अनेक पत्रकारांनीही तसे पतंग उडवणे सुरू केले होते. अरविंद केजरीवाल
यांनी आम आदमी पक्षाला 150 जागा मिळतील, असे भाकीत एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमात जाहीरपणे व्यक्त
केले होते. ‘आप’ला गुजरातमध्ये 150 जागा मिळणार आणि
दिल्ली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 20
पेक्षा कमी जागा मिळणार, असे दूरचित्रवाणी वाहिनीच्या
पत्रकाराला लेखी दिले होते. पंजाब विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे हवेत गेलेल्या
‘आप’च्या फुग्याला मतदारांनी टाचणी लावली. गुजरात विधानसभा निवडणुकीत 1985 मध्ये काँग्रेसला 149 जागा मिळाल्या होत्या.
सर्वाधिक जागा जिंकण्याचा काँग्रेसचा हा विक्रम भाजपाने मोडीत काढला. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणिकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाबरोबर गुजरात
सरकारच्या वेगवेगळ्या लोककल्याणकारीयोजनांना मतदारांनी भरभरून पसंती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशाचे गमक त्यांच्या सर्वसामान्यांशी स्वत:ला
सहजपणे जोडण्याच्या कार्यशैलीत दडले आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्यालाभार्थ्यांसह
खेळाडू, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक,
कलाकार, विद्यार्थी या मंडळींशी
पंतप्रधान मोदी विविधमाध्यमातून विलक्षण सहजतेने आणि आत्मियतेने संवाद साधतात.
आपल्यावर होणार्या टीकेला एका शब्दानेही उत्तर न देता ते शांतपणे काम करत राहतात.
सर्वसामान्य माणसाचे जीवन सुधारण्यासाठी मोदी सरकारने
आखलेल्या योजना अंत्योदयाचे उद्दिष्ट साध्य करणार्या ठरल्या आहेत. पीक विमासारखी
योजना शेतकर्यांच्या हिताचे बदल केल्यामुळे कोट्यवधी शेतकर्यांना नैसर्गिक
आपत्तींपासून संरक्षण मिळाले आहे. हे ‘मोदीनॉमिक्स’ भल्या-भल्या विचारवंतांच्या
आणि विश्लेषकांच्या लक्षात येत नाही. राज्यकर्त्यांची विश्वासार्हता अशा
योजनांच्या लाभांची फळे लाभार्थींपर्यंत 100 टक्के
पोहचल्यानंतर उंचावत राहते. काशिविश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी या
मंदिराचे बांधकाम करणार्या कारागिरांचा आणि मंदिरातील सफाई व अन्य काम करणाऱ्या
कर्मचार्यांचा पंतप्रधान मोदी यांनी फुले उधळून सन्मान केला आणि त्यांच्याबरोबर
पायर्यांवर बसून त्यांच्याशी संवादही साधला होता. तसेच त्यांच्याबरोबर
पंतप्रधानांनीही भोजनही घेतले होते. हे त्यांच्याकडून नैसर्गिकरित्या घडले जाते.
अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून सामान्य माणसाला पंतप्रधान मोदी यांच्या विषयी
कुटुंबप्रमुखांसारखी आधाराची भावना वाटू लागली आहे.
पंजाब विधासनभा निवडणुकीत मोफत योजनांची आश्वासने देत
सत्ता मिळवलेल्या आम आदमी पक्षाने गुजरातमध्येही याच धर्तीवर प्रचार केला होता.
मतदारांनी हा प्रचार धुडकावून लावला. पंजाबलगतच्या हिमाचल प्रदेशातही आम आदमी
पक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. भारतीय जनता पार्टीपुढे काँग्रेस आव्हान
उभा करू शकत नाही, हे लक्षात आल्याने आम आदमी पक्षाच्या शिडात वारे भरण्याचा प्रयत्न
विचारवंत, लेखक, माध्यमतज्ज्ञ
यांनी सुरू केला होता. मतदारांनी आपच्या शिडात भरलेली ही हवा काढून टाकली आहे. 2024 च्या निवडणुकीतही गुजरातच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल, यात शंका नाही.
जाता जाता- उत्तर प्रदेशातील रामपूर या अल्पसंख्याक बहुल
विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे.
मोदी सरकार अल्पसंख्याक विरोधी आहे, असा सातत्याने प्रचार करणार्या
मंडळींना या निकालाने सणसणीत चपराक बसली आहे.
काँग्रेसच्या युवराजांवर कॅडबरी च्या 'कभी कुछ ना कर के भी देखो' या जाहिरातीचा फारच
प्रभाव पडला असावा. त्यामुळेच ते हिमाचल प्रदेशकडे फिरकले नसावेत. त्याचाही
काँग्रेसला फायदा झाला असावा.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, १२ डिसेंबर. २०२२)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment