वेदांत-फॉक्सकॉनचे
अनिल अग्रवाल यांनी यासंदर्भात ट्विट करून वस्तुस्थिती मांडली होती. तरीही
महाविकास आघाडीचे कारभारी फॉक्सकॉनचे तुणतुणे वाजवतच बसले.
राज्यात
गेल्या काही दिवसात कथित वादग्रस्त वक्तव्यांची मोठी चर्चा झाली. नॅनो का होईना पण
मोर्चा निघाला. सत्ता गेल्यामुळे मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या विरोधकांना
शिंदे-फडणवीस सरकारच्या धडाकेबाज कार्यशैली विरोधात बोलण्यासाठी मुद्दा शिल्लक
राहिला नसल्याने अपप्रचाराची राळ उडवून देण्यात आली. यात प्रसार माध्यमांची काही
मंडळीही तसेच विचारवंत, बुद्धिमंत
वर्गातील मंडळीही सहभागी झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या
कार्यकाळातील नाकर्तेपणा महाराष्ट्राच्या मुळावर आला. 2019 ऑक्टोबरपर्यंत विकासात देशात अग्रेसर असलेलं महाराष्ट्र राज्य गेल्या अडीच
वर्षात पिछाडीवर पडलं. राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ कमी झाला. वेदांत फॉक्सकॉन
सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यांच्या वाट्याला गेले. राज्याच्या
गृहमंत्र्यानेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांना 100 कोटींच्या
वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले. मुकेश अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतीच्या
निवासस्थानाबाहेर मुंबई पोलीस दलाचा एक अधिकारी स्फोटकाने भरलेली गाडी उभी करतो
आहे, असे चित्रही महाराष्ट्राने पाहिले. महाराष्ट्राची
वाटचाल ही जंगल राजबाबत देशभर बदनाम झालेल्या बिहारलाही मागे टाकण्याच्या दिशेने
चालू आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी
मुख्यमंत्र्यांच्या आज्ञेने सारे पोलीस दल कामाला लागल्याचे चित्रही महाराष्ट्राने
पाहिले. कंगना रणौत या अभिनेत्रीच्या कार्यालयातील अवैध बांधकाम तोडल्यानंतर त्यावेळच्या
सत्ताधारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जणूकाही चीनवर विजय मिळवला आहे, अशा थाटात 'उखाड़ दिया' सारखी गर्जना केली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरुद्ध
वादग्रस्त मजकूर प्रसारित केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री केतकी चितळे
हिच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल केले गेले. दडपशाही आणि निर्दयी, क्रूर कारभाराचे अनेक नमुने पेश केलेल्या महाविकास आघाडी सरकारची सत्ता
सहा महिन्यांपूर्वी खालसा झाली. आपल्याला सतेतून कोणीही हटवू शकणार नाही या
गुर्मीत वावरणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता गेल्यानंतर आलेले वैफल्य
अजून कायम आहे. या वैफल्यामुळेच वेगवान आणि धडाकेबाज कारभार करणाऱ्या शिंदे फडणवीस
सरकारविरोधात खोटी नाटी माहिती पसरवण्याचा उद्योग महाविकास आघाडीच्या नेते
मंडळींनी सुरु केला. बेळगावचा सीमाप्रश्न, राज्यपाल आणि
चंद्रकांतदादा पाटील यांची वक्तव्य याबाबत खोटे-नाटे बिंबवण्याचा उद्योग आघाडीच्या
कारभाऱ्यांनी सुरु केला. याबाबत आघाडीच्या कारभाऱ्यांनी गोबेल्सलाही मागे टाकले
आहे. 1933 मध्ये जर्मनीत नाझी पक्ष सतेवर आल्यानंतर
हिटलरचा विश्वासू सहकारी असलेल्या गोबेल्सने जर्मनीतील प्रसारमाध्यमांवर पूर्णतः
नियंत्रण मिळवले. गोबेल्सने अपप्रचाराची नीती विकसित करताना एक सिद्धांत मांडला.
एकदा बोललेले खोटे हे खोटेच राहते पण हजार वेळा बोललेले खोटे हे सत्य बनते,
असा सिद्धांत होता. (A lie told once remains a lie but a
lie told a thousand times becomes the truth) दुसऱ्या महायुद्धात
मित्र राष्ट्रांपुढे जर्मनीची पिछेहाट होत होती, त्यावेळी
गोबेल्सने हिटलरकडे असलेल्या गुप्त शस्त्रांच्या जोरावर जर्मनी विजय मिळवेल,
अशी बातमी जर्मनीमध्ये पसरवली. महाविकास आघाडीच्या कारभा-यांनी
खोटी माहिती पसरवण्याबाबत गोबेल्सलाही मागे टाकले आहे. काही महिन्यांपूर्वी शिंदे
फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील उद्योग तेलंगाणा आणि गुजरातमध्ये गेले अशी
हाकाटी महाविकास आघाडीच्या कारभा-यांनी केली होती. मात्र वेदांत फॉक्सकॉनचा
प्रकल्प महाराष्ट्रात सुरु होणे शक्य नाही, असे जाहीर
वक्तव्य महाविकास आघाडीतील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले होते. आघाडी
सरकारच्या हातून सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या चिरंजिवांनी
प्रसारमाध्यमांपुढे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये
गेला असे काही कागद फडकावत जाहीर करून टाकले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात
वेदांत फॉक्सकॉनकडे जमीन, पाणी आदी संदर्भातील पाठपुरावा
योग्य पद्धतीने न झाल्यामुळे या प्रकल्पाने गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
वेदांत-फॉक्सकॉनचे अनिल अग्रवाल यांनी यासंदर्भात ट्विट करून वस्तुस्थिती मांडली
होती. तरीही महाविकास आघाडीचे कारभारी फॉक्सकॉनचे तुणतुणे वाजवतच बसले.
सॅफ्रनसारखा प्रकल्प
तेलंगाणामध्ये गेल्याचे खोटे वृत आघाडीने याच पद्धतीने पसरवले. सॅफ्रनचा प्रकल्प
हैद्राबाद येथे सुरू होत असल्याचे या कंपनीच्या प्रमुखाने 2 मार्च, 2021 रोजी ट्विटद्वारे जाहीर केले
होते. 2021 मध्ये या प्रकल्पाचे उदघाटन झाले. असे
असतानाही हा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात तेलंगणामध्ये गेला,
असे आघाडीचे नेते एक सुरात बोलू लागले. प्रेमात आणि युद्धात सर्व
काही क्षम्य असते असे म्हटले जाते. राजकारणात काही वेळा डावपेच खेळताना
प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आरोप-प्रत्यारोप केले जातात. मात्र असे आरोप-प्रत्यारोप
करताना खोटे किती बोलावे, याला मर्यादा असते. आघाडीच्या
कारभाऱ्यांनी ही मर्यादा पाळली नाही. सारे विधीनिषेध धुडकावत आघाडीचे नेते
खोटेपणालाही लाज वाटेल, अशा पद्धतीची माहिती पसरवताना
आढळून येत आहेत. राज्यपाल महोदयांच्या एका वक्तव्यावरून मोठे रान पेटवण्यात आले.
मात्र याच पद्धतीचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले
आणि छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पंक्तीला शरद पवारांना नेऊन बसवले. जयंत
पाटलांच्या या तुलनेनंतर एकही निषेधाचा सूर उमटला नाही. चंद्रकांतदादा पाटील यानी
महापुरुषांच्या शैक्षणिक कार्यासंदर्भात केलेल्या उद्गारावरून त्यांच्यावर
उद्धवराव आणि त्यांचे चेले भलतेच संतापले होते. चंद्रकांतदादांनी याच संदर्भात
उद्धवरावाचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी काय म्हटले होते हे प्रबोधनकारांच्या
"माझी जीवनगाथा "या पुस्तकातील उताऱ्याच्या साह्याने दाखवून दिल्यावर
सामना काराची वाचा बसली.
कर्नाटक
सीमा प्रश्नाबाबत अशीच खोटी माहिती पसरवली गेली. कर्नाटक सीमा प्रश्न ज्यावेळी
अस्तित्वात आला त्यावेळी केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात काँग्रेसचे सरकार होते. तरीही
हा वाद वर्षानुवर्ष सुरू शकला नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित
आहे. असे असताना कर्नाटक सरकार महाराष्ट्राची चाळीस गावे आपल्यात सामील करून घेणार,
असा धडधडीत खोटा प्रचार आघाडीने सुरू केला. अशा खोट्या
प्रचारामुळे काही काळ खळबळ माजते, संभ्रम निर्माण होतो.
मात्र अशा प्रचारावर सामान्य माणूस सहजासहजी विश्वास ठेवत नाही, हे आघाडीच्या नेत्यांना ठाऊक नाही. एवढा अपप्रचार करुनही आघाडीने
मुंबईत काढलेल्या मोर्चाला 30-40 हजारही लोक जमले नाहीत.
यावरूनच या अपप्रचारावर सामान्य माणसाने नव्हे तर आघाडीच्या सामान्य
कार्यकर्त्यानीही विश्वास ठेवला नसल्याचे सिद्ध झाले आहे. अनेकवेळा तोंडावर
आपटूनही महाविकास आघाडीच्या कारभा-यांना शहाणपण येणार नाही. राजकीय कुरघोडीच्या
खेळात चाली करताना किती पायऱ्या खाली याव्यात याचं भान सुटू दयायचं नसत, तो विवेक आघाडीच्या कारभाऱ्यांना ठेवता आला नाही. कितीही खोटे बोलले
तरी कधी ना कधी सत्य प्रकाशात येतंच. यासाठीच तुकाराम महाराज म्हणतात
आपुली
कसोटी शुद्ध राखी कारण । आगीने भूषण अधिक पुटा ||१||
नाही
कोणासर्वे बोलणे लागत । निश्चितीने चितसमाधान ||२||
लपविले तेही ढेकरे उमटे
खोटियाचे खोटे उर फोडी ||३||
ज्या गोबेल्स नीतीचा आधार घेऊन खोटं नाट पसरवलं जातंय त्याच
गोबेल्स ने There will come a day, when all the lies will collapse under
their own weight, and truth will again triumph. ( कधी ना कधी
खोट्याचा प्रभाव संपतो आणि सत्याचा विजय होतो ) असेही म्हंटले होते हे महाविकास
आघाडीच्या कारभाऱ्यांनी विसरु नये.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, २६ डिसेंबर. २०२२)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment